चितलवाडी (अकोला) : तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी शेतशिवारात पाण्याच्या शोधार्थ फिरत असलेला बिबट एका कोरड्या विहिरीत पडल्याची घटना शनिवार, १६ मे रोजी उघडकीस आली. सदर बिबट हा रात्रीच्या सुमारास विहिरीत पडला असून, त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरु केले आहे.चितलवाडी शेतशिवारात नागोराव पात्रीकर यांच्या शेतात विहिर असून, तीला पाणी नाही. रात्रीच्या सुमारास दोन ते तीन वर्षाचा एक बिबट या विहिरीत पडला. नागोराव पात्रीकर हे सकाळी शेतात गेले असता, त्याना विहिरीत बिबट पडल्याचे दिसले. याबाबत त्यांनी पोलिस पाटील यांना दिली. पोलिस पाटील यांनी हिवरखेड पोलिस व वनविभागाला याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच हिवरखेड पोलिस व अकोट व परतवाडा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. सकाळी ९ वाजतपासून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. बिबट विहिरीत पडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.