अकोला : गत आठ दिवसांपासून यावलखेड, बोंदरखेडसह गुडधी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, गुडधीच्या नागरिकांना दिसल्याने गुडधीच्या नागरिकांसह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संध्याकाळ व सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या अकोलेकरांचे प्रमाण कमी झाले आहे.गत आठ दिवसांपूर्वी हा बिबट्या बोंदरखेड शिवारात रेल्वे रुळाजवळून जात असल्याचे रेल्वे इंजीनच्या चालकास दिसल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेचा कर्मचारी विजय कनिराम राठोड मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रेल्वेचे काम करीत असताना त्यांना रेल्वेच्या पोल क्रमांक ५९३ ते ५९४ दरम्यान बिबट्या दिसला. बिबट्याला बघताच कर्मचाºयाने यावलखेड गावाकडे धाव घेतली. त्यांनी तसे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बाभूळगाव व गुडधी शिवारात बिबट्याचे दर्शन झाले असून, ट्रकचालकाने बिबट्याचे चित्र मोबाइलमध्ये घेतले. त्यांनी ही माहिती गुडधीच्या नागरिकांना दिली. रविवारी पुन्हा यावलखेड गाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याचे वाटकरूंनी सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व परिसरात वन्य प्राण्याचा चांगलाच वावर आहे. येथे बिबट्याला सहज शिकार मिळत असावी म्हणूनच गत आठ ते दहा दिवसांपासून बिबट्या या भागात रमला असल्याचा तर्क गावकरी काढत आहेत. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्याने गुडधी, यावलखेड, बोंदरखेड, पांढरी, बाभूळगाव आदी गावच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने मार्निंग वॉकला जाणाºया अकोलेकरांचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान बिबट्या दिसल्याची ही अफवा आहे की सत्य याची खातरजमा वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयांनी करावी अशी मागणी गुडधी गावकºयांसह संतोष पाटील पावडे यांनी केली आहे.