दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील आलेगाव वनविभागअंर्तगत येत असलेल्या जांभरून-विवरा फाट्यानजीक शनिवारी सायंकाळ ६ वाजताच्या दरम्यान दिग्रस बु. येथील दुचाकीस्वाराला बिबट्या दिसून आला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिग्रस बु. येथील सुनील गवई व जीवन गवई हे दुचाकीने विवरा येथून घरी दिग्रस बु. येथे परत येत असताना विवरा फाट्यानजीक वळण मार्गावर बिबट्या दिसून आला. बिबट्या दिसताच दोन्ही युवकांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिसरात बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीत शेतशिवारात उन्हाळी पिके आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी नेहमी जातात. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.