अकोला : आकोट तालुक्यातील जितापूर अडगाव शेतशिवारात रानडुक्कर व बिबट रविवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळले. या बिबटचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की शिकार करण्यात आली, याबाबत शंका कुशंकांना ऊत आला आहे. आकोट तालुक्यातील जितापूर अडगाव परिसरातील राजेश्वर राऊत यांच्या शेतात बिबट व रानडुक्कर मृतावस्थेत पडले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राऊत यांनी येथील वनविभागाच्या अधिकार्यांना रविवारी दुपारी याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता रानडुक्कर व बिबटचा मृतदेह निदर्शनास पडला. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वी दोघांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. एका झुडपात रानडुकराचा तर त्यापासून ५0 फूट अंतरावर बिबटचा मृतदेह निदर्शनास पडला. मात्र, रात्र झाल्यामुळे पुढील तपास सोमवारी करण्यात आला. याबाबबत माहिती देताना वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (वने) जे. एन. तराळे यांनी सांगितले, की रानडुकराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एका झुडपामध्ये निदर्शनास पडला. दोन ते तीन दिवसांपूर्वी या रानडुकराचा मृत्यू झाला असावा. रानडुकराच्या पाठीमागचे मांस बिबटने खाल्लयाच्या खुणाही दिसल्या. त्यानंतर तेथूनच ५0 फूट अंतरावर बिबट मृतावस्थेत पडलेला दिसला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच याचाही मृत्यू झाला असावा. आम्ही बिबटचे शवविच्छेदन केले आहे. तसेच पुढील तपासणीसाठी नमुने पाठविणार आहे. शेतकरी रानडुक्कर किंवा हरणांच्या शिकारीसाठी पीठाच्या गोळ्यात थिमेट टाकून ठेवतात. हे गोळे खाल्ले की जनावरांचा मृत्यू होतो. रानडुकराने थिमेट टाकलेला गोळा खाल्लय़ाने त्याचा मृत्यू झाला असावा, त्या रानडुकराचे मांस बिबटने खाल्लय़ाने त्याचाही मृत्यू झाला, असे घटनास्थळावरील परिस्थितीवरून निदर्शनास येत आहे.
बिबट मृतावस्थेत आढळला; शिकार की विषबाधा?
By admin | Published: August 25, 2015 2:49 AM