अकोला: कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमदरम्यान तपासणी करून, जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोगाचा एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, असे निर्देश विभागीय आरोग्य उपसंचालक डाॅ. रियाज फारुकी यांनी २ डिसेंबर रोजी कान्हेरी सरप येथे आरोग्य पथकांना दिले.
शहरी व ग्रामीण भागात १ ते १६ डिसेंबर या कालावधीत सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांच्या पथकांव्दारे गृहभेटी देऊन क्षयरोग व कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने २ डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालक डाॅ. रियाज फारुकी यांनी जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे गृहभेट देऊन मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. राजकुमार चव्हाण, माता-बालसंगोपन अधिकारी डाॅ. मनीष शर्मा, डाॅ. आदित्य महानकर उपस्थित होते. कुष्ठरोग व क्षयरोगाचा रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी मोहिमेदरम्यान तपासणी करून रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डाॅ. फारुकी यांनी आरोग्य पथकांना दिले, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी कळविले आहे.