गत काही वर्षांपासून अवेळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यंदाही जूनच्या सुरुवातीला पाऊस बरसला. परंतु २०-२२ दिवस पावसाने पाठ फिरविली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पीक चांगले बहरले असताना शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यातून वाचलेले पीक किडींमुळे धोक्यात आले. दोन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. किडींचा हल्ला झालेल्या पिकांना हा पाऊस फायदेशीर असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
२४ तासांत ९.६ मिमी पावसाची नोंद
सोमवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात ९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अकोला तालुक्यात १९.४ मिमी पावसाची नोंद झाली.
सरासरी २१५.५ मिमी पाऊस
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १३२.९ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी २१५.५ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. या पावसात जवळपास ४० टक्के तूट दिसून येत आहे.
मंगळवारी, बुधवारी बरसला पाऊस
अकोला शहरात मंगळवारी दिवसभर काही तासांच्या अंतराने पाऊस बरसला. सायंकाळच्या सुमारासही चांगला पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. बुधवारीही सायंकाळी काहीवेळ पाऊस झाला.