लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : हातरुण निमकर्दा वीज उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणार्या बोरगाव वैराळे गावात येथील ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंग न घेता वीज देयक देण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्यामुळे येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच बाळापूर येथील उपविभागीय अभियंता पी.डी. काळे यांनी बोरगाव वैराळे गावात मीटर रिडिंग घेण्याचे काम करणारे संजय भाकरे व महेश घोपे या दोघांना तडकाफडकी कंत्राटी कामावरून कमी केले. तसेच बाळापूर तालुक्यातील वीज मीटरचे रिडिंगचे काम करण्याचे कंत्राट रद्द करून खामगाव येथील कंत्राटदाराला दिले. बोरगाव वैराळे येथील माणिकराव वैराळे यांचे २२ हजार, तर विनायक वानखडे यांचे २३00 रुपये बिल कमी करून, नव्याने दुसरे बिल दिले असल्याची माहिती उपविभागीय अभियंता पी.डी. काळे यांनी दिली बोरगाव वैराळे येथील ५0 टक्के वीज ग्राहकांना रिडिंग न घेता वीज मीटर फॉल्टी दाखवून अंदाजाने अव्वाच्या सव्वा वीज देयके कंत्राटदाराची खासगी व्यक्ती देत असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे बोरगाव वैराळे येथील माणिकराव वैराळे यांना ३0 हजार रुपये, तर विनायक वानखडे यांना ५२५0 रुपये वीज देयक देण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करताच उपविभागीय अभियंता यांनी या दोन्ही ग्राहकांना बाळापूर येथे बोलावून घेऊन माणिकराव वैराळे यांचे २२ हजार वीज बिल कमी करून केवळ आठ हजार बिल भरण्याबाबत सांगितले व विनायक वानखडे यांना २३00 रुपये कमी करून २९५0 रुपये बिल भरण्याबाबत सांगितले.
बोरगाव वैराळे येथील वीज मीटर रिडिंग घेण्याची जबाबदारी असणार्या संजय भाकरे व महेश घोपे या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यासोबत बाळापूर तालुक्याचे कंत्राटदेखील या कंत्राटदाराना कडून काढून घेण्यात आले आहेत. नवीन कंत्राटदारांना काम देण्यात आले असून, ९0 टक्के ग्राहकांना रिडिंगनुसार बिले देण्यावर आमचा भर राहील.-पी.डी. काळे, उपविभागीय अभियंता बाळापूर