संतोष येलकर / अकोलास्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या तज्ज्ञांनी गेल्या वीस दिवसांत जिल्ह्यातील ७९ गावांमध्ये घरोघरी भेटी देऊन, २ हजार ५४२ कुटुंबांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले. स्वच्छतेसाठी विविध उपाययोजनांची माहिती देत, ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये शंभरपेक्षा जास्त शौचालय नाहीत, अशा ७९ ग्रामपंचायतींची निवड करून, गृहभेटी अंतर्गत ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याची मोहीम गेल्या २ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. या मोहिमेत २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या जिल्हास्तरावरील तज्ज्ञ आणि सल्लागार तसेच तालुका स्तरावरील गट व समूह समन्वयकांनी ७९ गावांमध्ये घरोघरी भेटी देऊन,२ हजार ५४२ कुटुंबांना स्वच्छतासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला तज्ज्ञांकडून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याची मोहीम जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांमध्ये स्वच्छताविषयी जागृती करण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी सांगीतले. *२७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता मेळावे!स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १८ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान कक्षाकडून जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्तरीय स्वच्छता मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांतून तज्ज्ञांमार्फत ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
अडीच हजारांवर कुटुंबांना स्वच्छतेचे धडे
By admin | Published: November 08, 2014 12:22 AM