अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पालकांचा व्हॉट्स अॅप गृप तयार करून, त्याद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम बाळापूर तालुक्यातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत शाळा-महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये अंगणवाड्या-बालवाड्या बंद असल्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम ठप्प आहे. या पृष्ठभूमीवर अंगणवाड्यातील चिमुकल्यांच्या पालकांचा व्हाट्स अॅप गृप तयार करून, त्याद्वारे अंगणवाडी सेविकांमार्फत अक्षर ओळख, रंग ओळख , स्पर्शज्ञान आदी प्रकारच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची माहिती पालकांना व्हॉट्स अॅपद्वारे दिली जाते. त्या माहितीच्या आधारे पालकांमार्फत चिमुकल्यांकडून कृती करून घेतली जाते. व्हॉट्स अॅप गृपद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्या मुला-मुलींना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गायगाव, अंदुरा, व्याळा, रिधोरा व निंबा इत्यादी पाच गावातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पालकांचा व्हाट्स अॅप गृप तयार करून बाळापूर तालुक्यात पाच गावातील २२ अंगणवाड्यांतील मुला-मुलींना अंगणवाडी सेविकांमार्फत पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.-भारती लांडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी, बाळापूर.