अकोला: जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. शालेय गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डाएट)च्या माध्यमातून मुख्याध्यापकांना धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ आॅक्टोबर रोजी मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली आहे.जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता खालावत असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. विद्यार्थी कॉन्व्हेंटकडे वळत आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या शाळांमधील गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेला सीईओ आयुष प्रसाद, ‘डाएट’चे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. वैशाली ठग, अधिव्याख्याता सागर तुपे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, शत्रुघ्न बिडकर, बळीराम झामरे, होलीक्रॉस कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका नीता फर्नांडिस उपस्थित राहतील. कार्यशाळेमध्ये मुख्याध्यापकांना अध्ययन स्तर, सगुण विकास कार्यक्रम, पीजीआय शाळा भेटी, मूल्यवर्धन, बालरक्षक व शाळाबाह्य मुले, एएलपी कार्यक्रम, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, कलचाचणी, अविरत,दिक्शा अॅप आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)