अकोला : लॉकडाऊनच्या काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाले होते. त्यातून शिक्षण क्षेत्रसुद्धा सुटले नाही. अशा भयावह स्थितीत शैक्षणिक प्रवाहामध्ये असलेले विद्यार्थी प्रवाहाबाहेर पडू नयेत, यासाठी महापालिकेतील अपर्णा अविनाश ढोरे या शिक्षिकेने ‘शिक्षक परिसर मैत्रीण संकल्पना’ राबवून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. त्यांच्या या उपक्रमाने शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या घरची परिस्थिती चांगली असल्याने ऑनलाइन शिक्षण शक्य आहे; परंतु कृषी नगर येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २२ मध्ये जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईलची सुविधा नाही. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचे आव्हान शिक्षकांपुढे होते. यावर शाळेतील शिक्षिका अपर्णा अविनाश ढोरे यांनी शिक्षक परिसर मैत्रीण संकल्पना राबविली. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षणाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवता आले.
अशी राबविली ‘शिक्षक मैत्रीण’ संकल्पना
लॉकडाऊन काळात शिक्षकांना मुलांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे शिक्षिका ढोरे यांच्या संकल्पनेतून परिसरातील उच्चशिक्षित ५ मुली-महिलांची शिक्षक परिसर मैत्रीण म्हणून निवड करण्यात आली. या परिसर मैत्रिणींना शिक्षिकेने स्वयंअध्ययन पत्रिकेच्या माध्यमातून सूचना दिल्या व मुलांना काय शिकवायचे, कसे शिकवायचे याबाबत माहिती दिली. या महिलांनी वस्तीत जाऊन प्रत्येकी ५-६ मुलांना घरी एकत्र करून शिक्षणाचे धडे दिले.
पटसंख्येत झाली वाढ
शिक्षिका ढोरे या चार वर्षांपूर्वी शाळेत रुजू झाल्या तेव्हा शाळेत फक्त ८-१० विद्यार्थी शिकत होते. त्यांनी शाळेत पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रम शिकविले, शिवीमुक्त अभियान राबविले. मनपाच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांना प्रेरित केले. यामुळे आजरोजी शाळेची पटसंख्या ७० झाली आहे.
या मैत्रिणींचा सहभाग
या उपक्रमात दीक्षा भारसाकळे, ज्योती कांबळे, प्रमिला चोपडे, विश्वशीला इंगळे, ज्योती मनवर या पाच परिसर मैत्रिणींचा सहभाग होता. यातील दोन परिसर मैत्रिणी आजही शाळेत या उपक्रमांतर्गत केजी १, केजी २ च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. यासाठी दोघींना शाळेतील शिक्षकांच्या पगारातून मानधन देण्यात येते.