अकोला: नैसर्गिक संसाधनांचा वापर करू न विकास साधण्यावर शासन भर देत असून, ग्रामीण भागात अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अनुषंगाने या तंत्रज्ञानाची सर्वंकष शास्त्रीय माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या तंत्रज्ञानाचा विकास व वापर करण्यासंबंधीचे धडे देशातील संशोधकांना देण्यात येत आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अपारंपरिक ऊर्जास्रोत या विषयावर संशोधन करू न विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. ग्रामीण भागात या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी भारतीय कृषी व कल्याण मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या भारतीय संशोधन परिषदेने लक्ष केंद्रित केले असून, अपारंपरिक ऊर्जेचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातून अकोल्याच्या कृषी विद्यापीठाची निवड केली आहे. १ आॅक्टोबरपासून या कार्यशाळेला सुरुवात झाली असून, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आदी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांसह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील या विषयाशी संबंधित शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला आहे.या ठिकाणी कृषीवर आधारित बायोगॅस उत्पादन, सोलर इलेक्ट्रिकल्स वाहने, शेतातील ऊर्जा कार्यक्षम यंत्र, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सिंचन व्यवस्था, बायोगॅस, शेतातील काडीकचºयापासून विटा तयार करू न ऊर्जानिर्मिती करणे, गोड्या ज्वारीच्या धांड्यापासून जैवइंधन या विषयावर येथे मंथन होणार आहे. या कृषी विद्यापीठाने राज्यातील ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्प लावण्याचे काम केले असून, या प्रकल्पांना भेटी देण्यात येणार आहेत. चिखलदरा येथील पवन ऊर्जा, शेगाव येथील पवन ऊर्जा पार्क कसा चालतो, याचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शास्त्रीय माहिती देण्यासाठी देशातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला आहे.
भविष्यात अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. सुरेंद्र काळबांडे, प्रमुख, अपारंपरिक ऊर्जा व इलेक्ट्रिक तथा कार्यशाळा संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला.