लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडणाऱ्या एका दलालास रुग्ण महिलेने बुधवारी चांगलाच धडा शिकविला. रक्त मिळवून देण्याच्या नावाखाली १५०० रुपये घेऊन पसार झालेल्या दलालास सदर महिलेने मोठ्या हिमतीने पकडून त्याला जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, महिलेला तिची रक्कम परत मिळाल्याने पोलिसांनी सदर युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.पातूर तालुक्यातील कमला खर्डे नामक महिला गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी १५ दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु रक्तपेढींमध्ये त्यांना हव्या असलेल्या या रक्तगटाचे रक्त मिळत नव्हते. रक्तपेढीच्या शोधात त्या सिव्हिल लाइन रोडवर पोहोचल्या. तेवढ्यात एक युवक त्यांच्याजवळ थांबला आणि काही मदत लागते का विचारले. कमला खर्डे या तब्येतीने अशक्त असल्याने त्यांनी त्याला जवळपासच्या रक्तपेढीचा पत्ता विचारला. त्याच्या आपुलकीमुळे महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. तो युवक महिलेला घेऊन राम नगरातील एका रक्तपेढीजवळ नेले. रक्तपेढीत ओळखी असून, रक्तासाठी १५०० रुपये लागतील म्हणून त्याने सांगितले. मोठ्या विश्वासाने महिलेने त्याच्याजवळ १५०० रुपये दिले; पण त्याने दगा केला. रात्र झाली, तरी तो आला नाही म्हणून महिलाही तेथून कशीबशी निघून गेली. दरम्यान, मंगळवारी महिला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात दाखल झाली. जेवणाच्या सुटीत महिला बाहेर आली. तितक्यात तो युवकही बाहेरच उभा असल्याचे महिलेला कळले. महिलेने त्याला मोठ्या हिमतीने पकडले आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे घेऊन गेली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या युवकाने महिलेला पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन, त्याच्याकडील सहाशे रुपये महिलेच्या हातात दिले. उर्वरित ९०० रुपये त्याच्या मित्राने आणून दिले. त्यापूर्वी पोलिसांनी त्याला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेले. महिलेला पूर्ण रक्कम मिळाल्याने हे प्रकरण शांत झाले.शासकीय रुग्णालयात सर्व उपचार, रक्त, औषधे सर्व मोफत उपलब्ध आहेत. दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, कोणी पैशांची मागणी केल्यास त्याबाबत तक्रार करावी. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.
सर्वोपचारच्या दलालास महिलेने शिकविला धडा
By admin | Published: May 18, 2017 1:00 AM