बुलडाणा : मागील चार वर्षांंंपासून दुष्काळाच्या झळा सोसणार्या शेतकर्यांना यावर्षी उत्पादनात घट येणार असल्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच शेतमालास निर्यातबंदी असून, तूर, कांदा आदी पिकांची आयात करण्यात येत आहे. त्याचा फटका देशातील शेतकर्यांना बसत आहे. शासनाने शेतमालाची निर्यातबंदी उठवावी व उत्पादित मालाला हमी भाव द्यावा, तरच निसर्गामुळे कोलमडलेला शेतकरी हिंमतीने उभा राहू शकतो, असा सूर लोकमतने ३0 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या परिचर्चेत सहभागी शेतकर्यांनी काढला. जिल्ह्यात मागील चार वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. प्रतिकूल हवामान, पावसाच्या अनियमिततेमुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खरीप हंगाम दगा देऊन गेला. यामुळे आर्थिक तथा मानसिकदृष्ट्या खचलेल्या काही शेतकर्यांनी आत्महत्येसारखा दुर्दैवी निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, काही सेवाभावी संस्थांनी विविध माध्यमातून शेतकर्यांना मदत केली; मात्र शेतकर्यांना जगवायचे असेल, तर शासनाने ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. अन्नधान्य पिकविणारा शेतकरी जगला, तरच देश जगेल, हा मूलमंत्र लक्षात घेऊन शासनाने उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा शेतकर्यांनी यावेळी व्यक्त केली. या परिचर्चेत समाधान पाटील,विष्णू पाटील कुळसुंदर, सुरेश पाटील, डॉ. बाबूराव नरोटे, देविदास कणखर इत्यादी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
शेतमालाला हमीभाव मिळावा!
By admin | Published: October 01, 2015 12:06 AM