अकोला : निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर एसटीची प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे; परंतु बहुतांश फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे बसच्या चालक-वाहकांवर प्रवाशांना आवाज देऊन बोलावण्याची वेळ आली आहे.कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आगार क्रमांक २ मधून ३० बस सोडण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या आहेत. जवळपास ३० टक्के बस अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद व प्रवासी नसल्याने ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या अद्याप बंद आहेत. निर्बंध शिथिल झाल्याने प्रवासी संख्या वाढण्याची अपेक्षा होती; परंतु काहीच मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
आगाराचे उत्पन्न केवळ पावणेतीन लाख
कोरोना काळाआधी येथील आगार क्रमांक २ चे उत्पन्न चांगले होते. जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक असल्याने येथे प्रवाशांची वर्दळही असते; मात्र आता या आगाराचे उत्पन्न घटले आहे. दररोज केवळ २ लाख ७५ हजार रुपयांच्या जवळपास उत्पन्न होत आहे.
आगारातील एकूण बस- ५२
सोडण्यात येणाऱ्या बस - ३२
सध्या होत असलेल्या फेऱ्या - ९०
निर्बंधामध्ये शिथिलता मिळाली, पण...
राज्य सरकारने काही जिल्ह्यामध्ये निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. त्यामुळे दळणवळण आणखी वाढणार आहे. यामुळे एसटी महामंडळाला फायदा होण्याची शक्यता आहे; मात्र तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे.
शिवशाही रिकाम्याच!
दुसऱ्या लाटेनंतर आता एसटी बस आणि खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत; परंतु तिसऱ्या लाटेच्या भीतीने प्रवासी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला प्रतिसाद मिळत नाही. सध्या अमरावती, औरंगाबाद मार्गावर शिवशाही बस आहेत.