अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले.लोकमत बाल विकास मंच व साम अॅकॅडमीच्यावतीने अकोला शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे आयोजित ‘ईको फ्रेंडली’ गणेशमूर्ती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दीपप्रज्वलन करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी राजेश खवले, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या मुख्याध्यापिका रश्मी गायकवाड, साम अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत चौथे, संचालक प्रा. सागर चौथे, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्याचे सांगत, कार्यशाळेत उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मित्रांनाही ईको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवायला शिकवून पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर लोकमत बाल विकास मंच व साम अॅकॅडमीच्यावतीने आयोजित ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले यांनी विचार मांडले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘लोकमत’च्यावतीने ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सागर चौथे, संचालन सुप्रिया पडगीलवार यांनी केले. ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रविवार सुटीचा दिवस आणि रिपरिप पाऊस सुरू असतानाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह पालकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवित गर्दी केली. कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून प्रा. सागर चौथे यांनी उपस्थितांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवायला शिकविले. कार्यशाळेत सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही गणेशमूर्ती साकारल्या. शाडू मातीपासून पर्यावरणपूरक लाडक्या बाप्पांची मूर्ती स्वत:च्या हाताने साकारल्याचा आनंद कार्यशाळेत सहभागी बालगोपालांच्या चेहºयावर ओसंडून वाहत होता.जिल्हाधिकाºयांनी साकारली ‘ईको फ्रेंडली ‘गणेशमूर्ती!कार्यशाळेत सहभागी चिमुकल्यांसोबतच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनीही शाडू मातीपासून स्वत: गणेशमूर्ती साकारून उपस्थितांना प्रोत्साहित केले.
शाडू मातीचा गणपती बनवूया; पर्यावरणाचे रक्षण करूया - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:37 IST