लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाकडून वारंवार सूचना, निर्देश दिले जात असले, तरी आस्थापनेवरील सफाई कर्मचारी त्यांच्या कामकाजात कोणताही बदल करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मनपाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांनी शुक्रवारी सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता एक-दोन नव्हे, तर चक्क १८ सफाई कर्मचारी कामावर उशिरा हजर झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शहराच्या कानाकोपऱ्यात नजर टाकली असता घाणीने व कचऱ्याने गच्च भरलेल्या सर्व्हिस लाइन, मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांजवळ साठवून ठेवलेले मातीचे ढीग, धुळीने माखलेले रस्ते असे चित्र दिसून येते. प्रामाणिकपणे कर्तव्य निभावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक असून, उर्वरित कर्मचारी चक्क चार-चार महिने कामावर गैरहजर राहणे पसंत करीत असल्याची धक्कादायक बाब प्रशासनाच्या तपासणीत समोर आली आहे. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे इतर प्रामाणिक सफाई कर्मचाऱ्यांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे. साफसफाईअभावी शहरात विविध आजारांनी डोके वर काढले आहे. मोकाट डुकरांमुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. साफसफाईसाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सफाई कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सर्व आवश्यक गरजू साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतरदेखील सफाई कर्मचारी कामावर हजर होत नसल्याची परिस्थिती आहे. मनपाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांनी शुक्रवारी सकाळी सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता हजेरी पुस्तिकेनुसार १८ कर्मचारी कामावर उशिरा आल्याचे समोर आले. अशा कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.
‘लेटलतिफ’ १८ सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कपात!
By admin | Published: May 20, 2017 1:30 AM