अकोला: भाषा आणि गणित विषयात ‘ढ’ असलेल्या इयत्ता सहावी-आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रम दिवाळीनंतर राज्यातील २४ तालुक्यांमधील जिल्हा परिषद, न.प. व खासगी अनुदानित २७२0 शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.विद्या प्राधिकरण पुणे मराठी विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील भाषा व गणितामध्ये माघारलेल्या सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी स्तराधारित अध्ययन संकल्पना (एलबीएल) कार्यक्रम २0१८-१९ साठी ठरविला आहे. ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी नैदानिक चाचणी घेण्यात येईल. त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे चार स्तर करण्यात येतील. या विद्यार्थ्यांचे ९0 दिवस ४५ मिनिटे अध्ययन घेऊन त्यांच्या अध्ययन स्तरात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एससीईआरटी’ने विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी प्रश्नपत्रिका व लाभार्थी विद्यार्थ्यांना माझी पुस्तिका भाषा-१ (मराठी) तयार केली आहे. ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रमादरम्यान प्रत्येक ४0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशा पद्धतीने ३ हजार २४३ शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षित शिक्षक वाचन-लेखन, गणित विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या शिक्षकांमागे ३२४ मेन्टॉरची नियुक्ती केली आहे. प्रशिक्षित शिक्षकांना ९0 दिवसांसाठी ‘एलबीएल’ कार्यक्रम आहे. (प्रतिनिधी)बाळापूर तालुक्यातील ३९00 विद्यार्थ्यांना भाषा, गणिताचे धडे!अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील ३९२९ विद्यार्थ्यांना भाषा व गणिताचे विशेष धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सुलभकांचे (मेन्टॉर) प्रशिक्षणसुद्धा घेण्यात आले असून, दिवाळी झाल्यानंतर एलबीएल कार्यक्रम राबविण्यास सुरुवात होणार आहे.