प्रशांत विखे
तेल्हारा: तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने चिंता वाढली आहे, तसेच सिंचनामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. दुसरीकडे, कृषी विभागाकडून जलसंधारणच्या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. तालुक्यातील भांबेरी येथे एका शेतकऱ्याने शेततळ्याचा लाभ घेतला. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेततळ्यामध्ये मुबलक पाणी असून, विहिरीच्या पातळीतही वाढ झाली आहे. दुसरीकडे, तालुक्यातील भूजल पातळी दिवेंसदिवस खालावत असल्याने जलसंधारण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
तालुक्यातील भूजलपातळी २३ मीटरपर्यंत खोल गेल्याने सिंचन क्षेत्रात घट होत आहे. कृषी विभागाचे माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भांबेरी येथील शेतकरी वर्षा नागाेराव इंगळे यांच्या शेतातील विहिरीचे पाणी खोल गेल्याने त्यांना सिंचनासाठी अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी पोक्रा योजनेंर्तगत सन-२०१९ मध्ये शेततळ्याचा लाभ घेऊन शेततळे खोदले. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेततळ्यात सद्यस्थितीत मुबलक पाणी आहे. शेततळ्यामुळे विहिरीची पातळीही वाढल्याचे इंगळे यांनी सांगितले. शेततळ्याच्या नियोजनाबाबत तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे व कृषी पर्यवेक्षक पी.जी. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या रब्बी हंगामात हरभरा पिकला पाणी देणे सुरू आहे. दुसरीकडे, तालुक्यातील भूजल पातळी दिवेंसदिवस खालावत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी केले आहे.
तालुक्याची भूजल पातळी चिंताजनक
जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत भूजल पातळी खोल गेली आहे. २०१८च्या तुलनेत २०२०मध्ये २ मीटरने वाढ झाली आहे. २०२० मध्ये भूजल पातळी ही २०.९३ मीटर खाली आहे.