सहयोगी शिक्षण अभियानाचा गोरव्हा येथे शुभारंभ
अकोला दि.१ - भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सहयोगी शिक्षण अभियानाचा बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा येथे शुभारंभ करण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शांतीलाल मुथ्था यांनी केलेल्या आवाहनाला गोरव्हा गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, गावात ५ समाज विद्या केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. वर्ग १ ते वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय जैन संघटनेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे वर्ग चालविण्यात येणार आहेत. यासाठी बीजेएसच्या वतीने विद्यार्थ्यांना वीनामूल्य पुस्तके देण्यात येणार आहेत. गोरव्हा येथील आदिवासीबहुल वाॅर्डातील सामाजिक भवनात पहिल्या वर्गाचा शुभारंभ बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रा. सुभाष गादिया यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच राजेश खांबलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी समाज विद्या केंद्र समितीचे निमंत्रक जनार्दन मंगलचनाप, सदस्य रामेश्वर खांबलकर आणि संगीता रामू जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर चनाप यांनी केले. गावात एकूण ५ समाज विद्या केंद्र सुरू करण्यात येणार असून, यासाठी १५ शिक्षण सारथींची निवड करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जैन संघटनेच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती सरपंच राजेश खांबलकर यांनी दिली. या वर्गासाठी सागर चनाप, संतोषी घासले आणि दिव्या भोयर यांची शिक्षण सारथी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रसंचालन सहयोगी शिक्षण अभियानाचे समन्वयक पंकज वाडेवाले यांनी केले. आभार प्रदर्शन संतोषी घासले हिने मानले.