अकोला: जिल्हा कृषी अधीक्षक तथा परवाना अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील १८ रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातील १२ परवाने हे दोन महिन्यांसाठी, तर सहा परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बियाणे कंपन्यांसह बियाणे विक्रेते कृषी विभागाच्या रडारवर होते. मध्यंतरी जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. याच दरम्यान जिल्ह्यातील रासायनिक खत विक्रेत्यांवरही जिल्हा कृषी अधीक्षक तथा परवाना अधिकाºयांची करडी नजर होती. २० व २१ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील १८ रासायनिक खत विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. यातील १२ घाऊक विक्रेत्यांचे परवाने दोन महिन्यांसाठी, तर ६ रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अकोला शहरासह तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, अडगाव, अकोट येथील रासायनिक खत विक्रेत्यांचा समावेश आहे.
म्हणून केले परवाने रद्दबियाणे खरेदी-विक्रीसोबतच रासायनिक खताच्या खरेदी-विक्रीचा दरमहा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील बहुतांश रासायनिक खत विक्रेत्यांकडून दरमहा अहवाल सादर केला जात नसल्याचे कारवाईतून निदर्शनास आले. हा प्रकार खत नियंत्रण आदेश १९८५ कलम ३५ (१) (अ) (ब)चे उल्लंघन असल्याचे सांगत जिल्हा कृषी अधीक्षक तथा परवाना अधिकारी मोहन वाघ यांनी रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने रद्द केल्याची माहिती आहे.
खत विक्रेते विभागीय स्तरावर करू शकतात अपीलरासायनिक खत विक्रीचे परवाने रद्द करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील रासायनिक खत विक्रेते विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांच्याकडे अपील करू शकतात, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
जिल्हा कृषी अधीक्षक तथा परवाना अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १८ रासायनिक खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १२ घाऊक रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने दोन महिन्यांसाठी, तर ६ रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.- नितीन लोखंडे, गुण नियंत्रक अधिकारी, कृषी विभाग अकोला.