अकाेला : राज्यात आयुर्वेदिक, युनानी व सिद्ध औषधांचे उत्पादन केल्यानंतर बाजारात विक्रीचा परवाना देण्यापूर्वी त्याच्या नूतनीकरणाची तपासणी केली जाणार आहे. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती ्स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे.
देशभरासह राज्यात मागील काही दिवसांपासून आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये युनानी औषधींचाही समावेश आहे. आयुर्वेदिक, युनानी व सिद्ध औषधींचे उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. आयुर्वेदिक औषधीच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांचे पेटंट मिळविण्याकडे ओढा वाढत चालला आहे. पेटंट मिळविलेल्या औषधींचे उत्पादन करणे व त्यांची बाजारात विक्री करण्यासाठी परवाना देणे किंवा परवान्यांच्या नूतनीकरणीकरणासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली हाेती. या समितीमध्ये नव्याने फेररचना करण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर हालचाली सुरू हाेत्या. परवाना देणे, त्याचे नूतणीकरण तपासणे व या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आयुष संचालनालयाचे संचालक अध्यक्षस्थानी असून इतर तीन तज्ज्ञांचा सदस्यपदी समावेश करण्यात आला आहे.