अकोला, दि. १२: अकोला विभागात दरवर्षी एलआयसीमध्ये होत असलेल्या सहा कोटींच्या उलाढालीवर विक्री कर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विभागातील एलआयसीच्या १३00 अभिकर्त्यांपैकी केवळ २५0 नोंदणीकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अभिकर्त्यांच्या एलआयसी संदर्भातील उलाढालींवर विक्री कर विभागाची नजर राहणार आहे. अकोला विभागात लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशनच्या दोन शाखा कार्यरत आहेत. या दोन्ही शाखांतून २९ विकास अधिकार्यांच्या नेतृत्वात जवळपास १३00 अभिकर्ता कार्यरत आहेत. अभिकर्त्यांच्या संख्येसोबत अकोल्यातील व्यवसायाची उलाढालही सातत्याने वाढत आहे. सहा कोटींची उलाढाल जरी एलआयसीच्या माध्यमातून होत असली तरी व्यवसाय कर भरणार्यांची संख्या मात्र २५0 च्या वर गेलेली नाही. व्यवसाय कर भरणार्यांच्या नोंदणीत वाढ करण्यासाठी विक्री कर विभागाने शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन शेकडो एलआयसी अभिकर्त्यांचे समुपदेशन केले. या बैठकीत विक्री कर विभागाने अनोंदणीकृत असलेल्या अभिकर्त्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास आता एलआयसी अभिकर्ता कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एलआयसीच्या कोट्यवधींच्या उलाढालीवर विक्री कर विभागाची नजर!
By admin | Published: September 13, 2016 3:03 AM