आकोट (जि. अकोला): येथील एका विवाहितेचा माहेरवरून पैसे आणण्याकरिता शारीरिक व मानसिक छळ करून, अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून ठार मारल्याप्रकरणी आकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा नवरा व सासरा या दोघांना जन्मठपेची शिक्षा सुनावली. २३ एप्रिल २0१२ रोजी आरोपी पती मकसूदअली सादिकअली, सासरा सादिकअली असरअली, नणंद कमरून्नीसा रोजानखान व मो. सादीक मो.याकूब रा. अंबोळीवेस आकोट व पंचगव्हाण हे मकसूदअलीची पत्नी रिजवानाखातून हिला आई-वडिलाकडून पैशाची मागणी करीत होते. तर कमरून्नीसा व मो. सादिक नंदोई हे तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. पैसे आणत नसल्याने आरोपी मकसूदअली व सादीकअली या दोघांनी रिजवानाखातूनच्या अंगावर रॉकेल टाकून प्रथम जाळण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान रिजवानाखातून मरण पावल्यामुळे खटल्यात ३0२ भादंवि समाविष्ट करण्यात आले होते. या खून खटल्याचा तपासानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश, आकोट यांचे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात दोषारोप सिद्ध करण्यासाठी सरकारपक्षाने एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यापैकी २ साक्षीदार फितूर झाले; परंतु अति. सत्र न्यायाधीश सु. वा. चव्हाण यांनी मृतकाची मृत्यूपूर्व जबानी व इतर परिस्थितीजन्य पुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी मकसूदअली सादीकअली व सादीकअली असदअली या दोघांना भादंवि ४९८ (अ) मध्ये ३ वर्षे सक्तमजुरी व दंड २000 रुपये प्रत्येकी व दंड न दिल्यास ३ महिने शिक्षा दिली. तसेच भादंवि कलम ३0२ मधे जन्मठेप व ३000 रुपये प्रत्येकी व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील ज. वा. गावंडे यांनी काम पाहिले, तर अँड. दिलदार खान, अकोला यांनी आरोपीची बाजू मांडली.
महिलेच्या हत्येप्रकरणी नव-यासह सास-याला जन्मठेप
By admin | Published: January 22, 2015 2:04 AM