अकोला : अकाेल्याच्या जुने शहरात शनिवारी झालेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १३ मेपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी दिले. सिटी कोतवाली व रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेले संचारबंदी निर्बंध हटविण्यात येऊन जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच रहदारी वाढली, दाेन दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठही सुरू झाली. दिवसभरात जनजीवन पुर्वपदावर आल्याचे चित्र हाेते.
दरम्यान जुने शहर व डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करून १५ मेपासून सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.त्यानुसार जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान काल संध्याकाळी पाेलीसांनी रूट मार्च काढून शांततेचे आवाहन केले हाेते. मंगळवारी दिवसभरात सर्वत्र शांतता हाेती.