रेल्वे स्थानकात दि. १ मार्च, २०२१ रोजी दुपारी २ वाजता एका प्लॅटफॉर्मवर एका नवजात शिशूला घेऊन आई नशेत आढळून आली. आई नशेत असल्याने तिचे शिशूकडे दुर्लक्ष होत होते. शिशू गंभीर अवस्थेत असल्याने रडत होते. रेल्वे स्थानकात सुगत वाघमारे यांच्या तीक्ष्ण गत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी अंतर्गत रेल्वे चाइल्ड लाइन कार्यरत असते. शिशू रडत असल्याची बाब रेल्वे चाइल्ड लाइन पथकाच्या लक्षात येताच, त्यांनी त्वरित अकोला बालकल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांना माहिती दिली. बाल कल्याण समितीने बालकाला त्वरित ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याचा आदेश दिला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने बालकाला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर तेथील तज्ज्ञांनी बालक हे गंभीर असून, त्याला वेळेवर उपचार मिळाले नसते, तर ते दगावले असते, अशी माहिती दिली. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.महेश जी. जयस्वाल, डॉ.मदन महल्ले यांचे सहकार्य लाभले.
रेल्वे चाइल्ड लाइन पथकाच्या सतर्कतेने वाचले नवजात बालकाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:33 AM