शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये खाटांची (बेड) संख्या जास्त असूनही कागदाेपत्री अत्यल्प दाखवून कंत्राटदाराचा खिसा जड करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य विभागातील काही अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना ६० लाखांची खिरापत वाटण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी प्रशासकीय यंत्रणेमार्फत शहराच्या कानाकाेपऱ्यातील सर्व खासगी रुग्णालयांमधील खाटांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका क्षेत्रातील जिल्हा सर्वाेपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयासह सर्व खासगी हाॅस्पिटल, क्लिनिकमधून निघणाऱ्या जैविक घनकचऱ्याची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त ठरते. रुग्णालयांमधून निघणाऱ्या जैविक घनकचऱ्यापासून अनेक गंभीर आजार पसरुन नागरिकांच्या जीविताला धाेका निर्माण हाेताे. दरम्यान, या कचऱ्याची उचल करणारा कंत्राटदार हाॅस्पिटलकडून शुल्क वसूल करुन त्याची राॅयल्टी मनपा प्रशासनाकडे सादर करताे. अर्थात, ही राॅयल्टी रुग्णालयांमधील खाटांच्या(बेड) संख्येवरुन निश्चित केली जाते. खरी गाेम याठिकाणीच दडली असून मुंबई नर्सिंग ॲक्टनुसार रुग्णालयाची व त्यामधील खाटांच्या एकूण संख्येची महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य विभागाकडे नाेंदणी करुन त्याबदल्यात अत्यल्प शुल्क जमा केले जाते. नाेंदणी करताना कागदाेपत्री खाटांची संख्या कमी दाखवून प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक खाटांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. नेमकी हीच बाब घनकचऱ्याची उचल करणारा कंत्राटदार, संबंधित अधिकारी व काही पदाधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.
‘ताे’अधिकारी नऊ महिने गायब
वैद्यकीय आराेग्य विभागातील एका अधिकाऱ्याने चक्क ३० वर्षांच्या कालावधीसाठी तयार केलेल्या करारनाम्यात घनकचऱ्याची उचल करणाऱ्या कंत्राटदाराचे हित जाेपासण्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यानंतर ‘ताे’अधिकारी तब्बल नऊ महिने गायब झाला. प्रामाणिक सेवा बजावल्यापाेटी या अधिकाऱ्याला २० लाखांची अदायगी देण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपमधील कलह निवळला!
मनपात ६ ऑगस्ट २०२१ राेजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत जैविक घनकचऱ्याचा प्रस्ताव मंजूर करण्यावरुन भाजपमध्ये महाभारत रंगले हाेते. पक्षाच्या बैठकीतही आराेप- प्रत्याराेपांच्या फैरी झडल्या हाेत्या. तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतर अचानक भाजपमधील कलह निवळला, हे येथे उल्लेखनीय.
विराेधकांची चुप्पी का?
खासगी रुग्णालयांमधील खाटांची प्रत्यक्षात असलेली संख्या व मनपाच्या दप्तरी कागदाेपत्री असलेल्या संख्येत माेठी तफावत आहे. या बाबीची विराेधी पक्ष काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना खात्री असताना सर्वांनी साधलेली चुप्पी संशयास्पद ठरत आहे.