अकोला: चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली असतानाही त्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीछुपे दारूचा अवैधरीत्या पुरवठा करण्यात येतो. अकोल्यातूनसुद्धा देशी-विदेशी दारूचा अवैधरीत्या पुरवठा होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. चंद्रपुरातील दोघांसह अकोल्यातील एका महिलेला अटक करून पोलिसांनी ५२ हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूचा साठा शुक्रवारी दुपारी जप्त केला.स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तिघे जण दारूचा साठा नेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी टॉवरजवळील लालबहादूर शास्त्री क्रीडांगणाजवळील रस्त्यावर सापळा लावला. या ठिकाणी एका बॅगेमध्ये दारूचा साठा घेऊन जात असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता, बॅगेत देशी-विदेशी दारूच्या ५४४ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी चंद्रपूर येथील राहणारे मंगेश रामदास माने (३२), लता नंदू माने यांच्या अकोल्यातील जेतवन नगरात राहणारी उषा भारत माने या तिघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी चंद्रपूरला दारूबंदी असल्यामुळे आम्ही अकोल्यातून देशी-विदेशी दारूची खरेदी करून रेल्वेगाडीने चंद्रपुरात जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मंगेश माने याला अटक केली, तर दोन महिलांची सुटका केली. आरोपींनी दारू कुठून खरेदी केली, याची माहिती पोलीस घेणार आहेत. (प्रतिनिधी)