अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातून येणारा दारूचा साठा शनिवारी सायंकाळी पकडला. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच देशी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात आयात आणि निर्यात सुरू झाली असून अशाच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातून येणारी तब्बल तीन लाख रुपयांची दारू विशेष पथकाने पकडून तिघांविरुद्ध कारवाई केली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा तेल्हाारा तालुक्यातून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी उकळी बाजार ते पोदरी या रस्त्यावर सापळा रचला असता शनिवारी सायंकाळी दहीगाव अवताडे येथील रहिवासी विशाल गोवर्धन सरदार, सागर नागोराव इंगळे व बेलखेड येथील रहिवासी निलेश लक्ष्मण दिघे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे एक लाख 60 हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध तेल्हाारा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच बाहेर जिल्ह्यातून अकोल्यात देशी व विदेशी दारूचा साठा अवैधरित्या आणण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे. दारूसाठा जप्त करण्याची मोठी कारवाई प्रथमच झाल्याची माहिती आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.
बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारा देशी दारूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 6:10 PM