अकोला: राज्यातील २७७७ पैकी १७२३ पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. येत्या १0 मार्चच्या आत अघोषित व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांच्या याद्या घोषित करणार असल्याचे आश्वासन कनिष्ठ महाविद्यालयाचे अधीक्षक भुसे आणि प्रशासन अधिकारी ज्योती शिंदे, दीपक पाटील यांनी शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांना बुधवारी दिले आहे.२0 टक्के अनुदानित शाळांवरील शिक्षकांना शाळा १00 टक्के अनुदानावर आल्याशिवाय अतिरिक्त ठरवू नये आणि अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली असता, तसा प्रस्ताव शासनास पाठविल्याचेही प्रशासन अधिकारी ज्योती शिंदे यांनी स्पष्ट केले. आयुक्त कार्यालयामार्फत २७७७ कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यातील कार्योत्तर मान्यता धरून १७२३ कनिष्ठ महाविद्यालयांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. यावेळी कमवि शिक्षक पदाची पात्रता असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकपदी पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २0१३-१४ मध्ये पटसंख्येअभावी वर्ग ६ ते ८ या गटात कमी झालेले एक पद सद्यस्थितीत पटसंख्येची अट पूर्ण करीत असल्याने ते कायम करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. एवढेच नाही तर १३ फेब्रुवारी २0१३ नंतर सेवेत रुजू कर्मचाºयांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. बुधवारी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे अधीक्षक भुसे, प्रशासन अधिकारी ज्योती शिंदे व दीपक पाटील यांची मुंबई येथील भेट घेऊन त्यांनी अमरावती विभागातील शिक्षक बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली असता शिक्षकांना नियमाच्या अधिन राहून शक्य तितक्या लवकरात लवकर न्याय देण्याचे आश्वासन कनिष्ठ महाविद्यालयीन अधीक्षक भुसे, प्रशासन अधिकारी ज्योती शिंदे व दीपक पाटील यांनी दिले आहे.