अकोला: जिल्ह्यात अनधिकृत टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी ४ जुलै रोजी जिल्ह्यातील अधिकृत शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थांची यादी जाहीर केली आहे. या अधिकृत संस्थांमध्येच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत अनधिकृत टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संख्या वाढत आहे. शासनाची परवानगी न घेताच, संगणक प्रशिक्षण संस्थांसोबत टंकलेखन व लघुलेखन संस्था उघडण्यात येत असल्याच्या तक्रारी शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. शासनमान्यता नसतानाही या अनधिकृत संस्थांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आर्थिक लूट करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांची फसवणूकसुद्धा करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यामुळे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी ई-प्रमाणपत्र दिलेल्या जिल्ह्यातील ९३ संस्थांची यादी जाहीर केली आणि या शासनमान्य संस्थांमधून जीसीसी टीबीसी परीक्षा प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देऊन परीक्षा घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी जिल्ह्यातील अनधिकृत टंकलेखन व लघुलेखन संस्थांपासून सावध राहावे. अधिकृत संस्थांना कोड नंबर देण्यात आले आहे. या कोड नंबरची पडताळणी करूनच विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घ्यावेत, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कळविले. (प्रतिनिधी)