अकोला : २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे माध्यमिक शिक्षण विभागाने मराठी शाळांमधील ६३ आणि अल्पसंख्याक शाळांमधील ६३ अशा एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी तयार केली आहे; परंतु समायोजनाचे पोर्टल बंद असल्याने ही माहिती त्यावर टाकण्यास विलंब होत आहे. काही शिक्षक व संस्थांमध्ये वाद असल्याने प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे त्यांची माहितीसुद्धा रखडली आहे.माध्यमिक शिक्षण विभागाने ३४७ पैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण केली आहे. शाळांना रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय आदींची माहिती मागविली असून, सध्या शिक्षण विभागाकडे मराठी शाळांमधील ६३ आणि अल्पसंख्याक शाळांमधील ६३ अशा एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांची नावे आली आहेत. उर्वरित शाळांची अतिरिक्त शिक्षकांची नावे अद्याप आली नाहीत. अतिरिक्त ठरविण्याच्या कारणावरून शिक्षक-शिक्षण संस्था चालकांमध्ये वाद सुरू आहेत. काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची यादी येण्यास विलंब होत आहे. शिक्षण संस्थांमध्ये सेवाज्येष्ठता डावलून शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येत असल्याने, या ठिकाणी शिक्षक आणि संस्था चालकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. हे वाद बाजूला सारून शिक्षण संस्थांनी त्यांच्याकडील अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी, आरक्षण, विषय आणि पटसंख्या याची माहिती माध्यमिक शिक्षक विभागाला सादर करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत; परंतु शिक्षण संस्था याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)