- संदीप वानखडे
अकोला : दीर्घ प्रतीक्षेनंतर पवित्र पोर्टलवर खासगी संस्थेतील इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातील पदासाठी शिफारपात्र ८३८ उमेदवारांची यादी ७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे. या शिफारसपात्र विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत निवड झालेल्या संस्थेत संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शासनाने शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन वर्षांपासून ही पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती सरकारला पूर्ण करता आली नाही. काही महिन्यांपूर्वी पवित्र पोर्टलवर प्राथमिक शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर इयत्ता ९ वी ते १२ वीच्या खासगी संस्थांमधील विनामुलाखत शिफारसपात्र विद्यार्थ्यांची यादी लागणार होती; मात्र काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने ही निवड यादी बरीच लांबली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार टक्केवारीमुळे पसंती क्रम न भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यानंतरही यादी लागण्यास बराच विलंब लागला.उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी दिलेल्या निर्णयानुसार पवित्र पोर्टलवर यादी प्रकाशित करण्यात आली आहे. ओबीसी या संवर्गासाठीची एक जागा वगळून एकूण इयत्ता नववी ते इयत्ता १२ वी गटातील ८३८ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या १० खासगी शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारसपात्र उमेदवारांची संस्थानिहाय यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी सैनिक व अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील (भूकंपग्रस्त) वगळता योग्य उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, अशी पदे त्या-त्या प्रवर्गातील प्युअरमध्ये रूपांतरित करून गुणवतेनुसार दुसरी शिफारसपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिफारसपात्र उमेदवारांना संबंधित संस्थेच्या नियुक्त प्राधिकारी यांच्याशी १५ फेब्रुवारीपर्यंत संपर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या फेरीनंतर मुलाखतीचा पर्याय निवडलेल्या खासगी संस्थांच्या जागांसाठी यादी जाहीर करण्यात येणार आहे.