अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्या; परंतु त्यानंतर पुढे काही हालचालच झाली नाही. शिक्षण विभागाच्या बेताल कारभारापुढे जिल्हा प्रशासनसुद्धा हतबल झाले आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनांची बैठक झाल्यानंतरही विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबितच आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने, विषय शिक्षकांची नियुक्ती करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने ही पदे भरावीत, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अकोला जि.प. मध्ये विषय शिक्षकांच्या पदभरतीअभावी सहा. शिक्षक अतिरिक्त झाल्याने, त्यांना रॅन्डम राउंडमध्ये तालुका बदलून नियुक्ती दिली. अशा शिक्षकांना विषय शिक्षकांच्या नियुक्तीनंतर होणाºया समायोजनात समाविष्ट करून जिल्हा स्तरावर समायोजन करावे, प्रलंबित पदोन्नती प्रकरणे निकाली काढावीत, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ३४ शिक्षकांना रिक्त जागा नसल्याने, त्यांना परत पाठविण्याऐवजी सामावून घ्यावे. यासह इतर समस्या शिक्षक संघटना समन्वय समितीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मांडल्या होत्या. पालकमंत्री रणजित पाटील यांनीसुद्धा प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून देत, शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी ना. पंकजा मुंडे यांच्याकडे केली. त्यानुसार ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी संबंधित अधिकाºयांना समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले होते; परंतु ७0 दिवस उलटूनही त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी ना जिल्हा परिषद प्रशासनाने केली ना प्राथमिक शिक्षण विभागाने केली. गेल्या काही दिवसांपासून प्राथमिक शिक्षण विभागाकडून विषय शिक्षकांच्या नियुक्तीबाबतचा केवळ लपंडावच सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्या कारभार सोपविल्यानंतर, विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना माध्यमिक शिक्षण विभागाच्या व्यस्त कामातूनच वेळ मिळत नसल्याने, त्यांच्याकडील पदभार काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या; परंतु प्राथमिक शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारायला कोणीच अधिकारी तयार होत नसल्यामुळे विषय शिक्षकांचा प्रश्न प्रलंबितच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पदभार काढण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र!प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार काढण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र दिले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या व्यस्त कामामुळे प्राथमिक शिक्षण विभागाला वेळ देता येत नाही. त्यामुळे आपल्याकडील पदभार काढण्यात यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.