अकोला: मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, जिवंत मतदारांना चक्क मयत दाखविणे, मयत उमेदवाराचे नाव बाद न करता त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांचे नाव बाद करणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा दुरुस्तीसाठी सादर केलेल्या अर्जाशिवाय असंख्य मतदारांवर ‘डिलिट’चा शिक्का मारून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इमानेइतबारे पार पाडले होते. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा घोळ टाळण्यासाठी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील व भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडेल, असा आशावाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला होता. ऐन मतदानाच्या दिवशी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य मतदारांना निवडणूक विभागाच्या हलगर्जीपणामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत असाच घोळ पुन्हा झाल्यास मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी निवडणूक विभागाकडे धाव घेतली. तसेच नागरिकांना त्या-त्या भागातील मतदान केंद्र उपलब्ध न करून दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा दावाही भाजपकडून क रण्यात आला. अशा मतदान केंद्रांमध्ये बदल करण्याची मागणी भाजपच्यावतीने भानुदास एन्नावार, नगरसेवक विजय इंगळे अजय शर्मा, अमोल गोगे, बबलू पळसपगार, रणजित खेडकर, राजेश चौधरी, योगेश नागपुरे, हेमंत शर्मा व रमेश करिहार यांनी केली आहे.जिवंत मतदार केले ‘डिलिट’!लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्र गाठल्यावर मतदार यादीमध्ये त्यांच्या छायाचित्रावर ‘डिलिट’चा शिक्का मारला असल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. मतदार जनजागृती मोहिमेत नवीन मतदारांचा समावेश करणे, मयत मतदारांची नावे बाद करणे तसेच पत्ता बदलण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केल्यावरच ‘बीएलओं’नी दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी मतदारांनी कोणत्याही दुरुस्त्यांचे अर्ज सादर न करताही निवडणूक विभागाने परस्पर घोळ घातला होता. यामुळे निवडणूक विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.