अकोला:
अकोल्यातील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय स्थानांतरित करण्याच्या निर्णयाला राज्य शासनामार्फत स्थगिती देण्यात आली असून, पशुधन विकास मंडळ अकोल्यातच ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची ग्वाही महसूल, पशुधन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.
जनावरांमधील 'लम्पी' या त्वचा रोगाचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी अकोला जिल्हा दौऱयावर आले असता, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पशुधन विकास मंडळाचे अकोला येथील मुख्यालय नागपूर येथे स्थानांतरित करण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती दिली असून, अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय पूर्वीप्रमाणे अकोल्यातच ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पशुसंवर्धन आयुक्त, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
'लम्पी' लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यकांची मदत घेणार!जनावरांमधील 'लम्पी' आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी खासगी पशुवैद्यकांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) दिल्या आहेत, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
बाधित जिल्ह्यात गुरांचे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना!'लम्पी' आजाराने बाधित राज्यातील १७ जिल्ह्यात गुरांचे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे महसूल मंत्र्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त ६०० पदे भरण्याचे आदेश!पशुसंवर्धन विभागांतर्गत राज्यात ६०० पदे रिक्त असून, ही रिक्त पदे भरण्याची प्रकिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.