- प्रवीण खेते
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या खाटा मिळत नसल्याने रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. त्यात जिल्ह्याबाहेरील कोविडच्या गंभीर रुग्णांचीही भरती वाढत आहे. त्या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयात खाटाही वाढविण्यात येत आहेत, मात्र रुग्णसेवेसाठी उपलब्ध मनुष्यबळ होते तेवढेच आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सध्या तारेवरची कसरत सुरू आहे, तर बाहेर रुग्णांना व्हेंटिलेटर अन् ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाचा उद्रेक होत असतानाही बेफिकिर राहिलेल्या अकोलेकरांना आता या महासाथीचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मृत्यूचा आकडा वाढला आहे. अनेकांना ऑक्सिजन अन् व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे, मात्र जिल्ह्यातील एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही. हीच स्थिती ऑक्सिजनच्या खाटांची आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांना खाटांच शिल्लक नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. त्याचा भार सर्वोपचार रुग्णालयावर येत असल्याने येथील खाटा वाढविण्यात येत असून, ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याचीही कसरत केली जात आहे. रुग्णसंख्या वाढल्याने कोविड वॉर्डची संख्या वाढली, मात्र हे सर्व सांभाळण्यासाठी रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बाहेरील रुग्णांची सर्वोपचार रुग्णालयात धाव सुरू झाल्याने रुग्णसेवेचा ताण आणखी वाढला आहे.
जीएमसीत ऑक्सिजन पॉईंट पडताहेत कमी
सर्वोपचार रुग्णालयातील कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड वॉर्डात ऑक्सिजनचे पॉईंट कमी पडत असल्याची माहिती आहे. तज्ज्ञांच्या मते ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनचे पॉईंट वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
ऑक्सिजनचा साठाही मर्यादित
खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अनियमित सुरू असल्याने मोठी टंचाई भासत आहे, तर सर्वोपचार रुग्णालयातही ऑक्सिजनचा साठा मर्यादित उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेळेत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध न झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्यीच गरज आहे.
मनुष्यबळ वाढविण्याची गरज
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा वाढविण्यात येत आहे, मात्र मनुष्यबळ वाढीकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केले जात आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असताना उपलब्ध वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे शासनाकडे वारंवार मागणी केली आहे, मात्र शासनाने त्याचे गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून येत आहे.