अकोला पश्चिमसह बाळापूरमध्ये इच्छुकांची ‘लॉबिंग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:31 PM2019-09-06T13:31:41+5:302019-09-06T13:33:37+5:30
इच्छुकांनी आपआपल्या ‘गॉडफादर’कडे लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ सध्या अकोल्यातील सर्वाधिक स्पर्धेचे मतदारसंघ ठरले आहेत. या दोन मतदारसंघांमध्ये आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे मुस्लीम मतदारांची संख्या. त्यामुळेच काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष या दोन्ही मतदारसंघांत परस्परांचा उमेदवार कोण, याकडे लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मुस्लीम उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. अॅड.आंबेडकर यांच्या पक्षाकडे असलेला हा एकमेव मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचे सर्वाधीक लक्ष राहणार आहे, तर दूसरीकडे काँग्रेसला अकोला पश्चीम हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत हवा आहे, या पृष्ठभूमीवर इच्छुकांनी आपआपल्या ‘गॉडफादर’कडे लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे.
गोवर्धन शर्मा यांना तगडे स्पर्धक
१९९५ पासून सातत्याने विजय मिळविणारे भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांना यावेळी तगडे स्पर्धक निर्माण झाले आहेत. २५ वर्षांपासून एकाच व्यक्तीकडे सत्ता केंद्रित झाल्यामुळे आता बदल हवा, अशी मानसिकता भाजपामध्येच जोर धरत आहे; मात्र आ. शर्मा यांचे पक्षातील स्थान व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख असल्याने जाहीरपणे विरोधाची भूमिका घेताना दिसत नाही; मात्र उमेदवारीसाठी अर्ज करून स्पर्धा अधोरेखित केली आहे. अॅड. मोतीसिंह मोहता, महापौर विजय अग्रवाल, डॉ. योगेश साहू, डॉ. अशोक ओळंबे, गोपी ठाकरे आदी दावेदार वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग करीत असल्याची माहिती आहे. काही नेत्यांनी थेट संघ दरबारातूनच वजन वापरण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याने भाजपा पक्षांतर्गतच राजकारण रंगले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या समर्थकांनीही अकोला पश्चिममध्ये उमेदवारीसाठी दावा केल्याने दोन्ही ‘नामदार गट’ एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करतीलच.
‘वंचित’मध्ये वाढले दावेदार; बाळापुरातही बदलाचे वारे!
दलित, बहुजन व मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न केला आहे. यानुषंगाने बाळापूर व अकोला पश्चिम हे दोन मतदारसंघ ‘वंचित’साठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघांत दावेदारांची संख्या वाढली. बाळापुरात विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी यावेळी धोक्यात असल्याची चर्चा आहे. ते सलग दुसऱ्यांदा येथून आमदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत बुलडाण्यातून सिरस्कारांना लढविण्यात आले. त्यामुळे आता सिरस्कारांना थांबा मिळेल, अशी चर्चा आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप सातत्याने होत आला आहे. त्यामुळे यावेळी बाळापुरात वंचितकडून वेगळे कार्ड खेळले जाण्याची शक्यता आहे. डॉ. रहेमान खान, गजानन दांदळे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर अशी प्रमुख नावे चर्चेत आहेत.
अकोला पश्चिम हा मतदारसंघ एमआयएमसाठी सोडला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. एमआयएमच्यावतीने नगरसेवक मो. मुस्तफा यांचा दावा आहे. ‘वंचित’कडून मो. सलिम, मनोहर पंजवाणी, अ. मुक्कदर अ. कादर यांची नावे चर्चेत आहेत. या नावाव्यतिरिक्त अॅड. आंबेडकर येथे धक्कातंत्राचा वापर करून वेगळा चेहरा रिंगणात उतरवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस व राष्टÑवादीच्या इच्छुकांची श्रेष्ठींकडे धाव
काँग्रेसकडून बाळापूर मतदारसंघ मिळावा, यासाठी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष व उमेदवारीचे प्रबळ दावेदार संग्राम गावंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेत मतदारसंघावरचा दावा प्रबळ केला आहे. काँगे्रसकडून येथे ऐनोद्दीन खतीब, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे आणि प्रकाश तायडे यांचीही नावे काँग्रेसकडून चर्चेत आहेत. बाळापूर राष्टÑवादीला मिळाला तर अकोला पश्चिम या मतदारसंघावरच राष्टÑवादीचा दावा संपणार आहे.
अकोला पश्चिममधून काँगे्रसचे साजीद खान पठाण, डॉ. जिशान हुसेन, रमाकांत खेतान, मदन भरगड, प्रदीप वखारिया अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. यापैकी काही इच्छुकांनी थेट काँग्रेसचे हेवीवेट नेत्यांसोबत संधान बांधून उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.