अकोला : पितृपक्ष संपल्यानंतर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या बदलीच्या चर्चेने जोर पकडला आहे. यादरम्यान, मनपाच्या आयुक्त पदासाठी राज्यातील तीन नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग केली जात असून यातील काही मुख्याधिकारी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. अशा परिस्थितीत उपायुक्त जुम्मा प्यारेवाले, पुनम कळंबे दिर्घ रजेवर गेल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची प्रशासकीय कारभार हाकताना दमछाक होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त, लेखापरीक्षक, मुख्यलेखाधिकारी, अग्निशमन अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, कार्यकारी अभियंता जलप्रदाय, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कर मूल्यांकन अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.
आयुक्त द्विवेदी यांनी शासनाकडे शिफारस पत्र सादर केल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नसल्यामुळे प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. परिस्थिती लक्षात घेता मागील काही दिवसांपासून आयुक्त कविता द्विवेदी बदलीच्या प्रयत्नात असल्याचे बोलल्या जात आहे. पितृपक्ष संपल्यानंतर त्यांच्या बदलीची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता मनपाच्या आयुक्त पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातील तीन नगरपरिषदांमध्ये सेवारत मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग केली जात आहे.