कारंजा (वाशिम) : नागरिकांच्या जन्म, मृत्यूच्या नोंदीप्रमाणेच अपंग व्यक्तिंची नोंदही स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिल्या असल्या तरी, या सूचनांचे पालन मात्र स्थानिक स्तरावर होत नाही. यासंदर्भात शासनाने २0 ऑगस्ट रोजी नव्याने निर्देश देत, अंपग व्यक्तिंची नोंद करून तद्विषयक अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केल्या आहेत. नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये केली जाते. त्याचप्रमाणे अपंग प्रमाणपत्र सादर करणार्या अपंग व्यक्तींची नोंदणीही स्थानिक स्तरावर करण्याच्या सूचना ४ ऑक्टोबर २0१३ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या होत्या; जवळपास २ वर्षे होत आली तरी, या सूचनांचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने यासंदर्भात २0 ऑगस्ट रोजी नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगांची नोंद, नोंदणी रजिस्टरमध्ये घेऊन सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, असे २0 ऑगस्ट रोजी शासनाच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे अपंगांना स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असून, अपंगांची आकडेवारी मिळविणेही शक्य होणार आहे.
अपंगांच्या नोंदणीला स्थानिक स्वराज्य संस्थांचा 'खो'
By admin | Published: August 21, 2015 10:49 PM