अकोला पोलिसांनी केली एमपीडीएअंतर्गत कारवाई
अकोला : अकोट फाईलतील नायगाव परिसरातील फरीदनगर येथील रहिवासी तसेच अवैधरित्या दारूभट्टी चालविणाऱ्या इसमास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सोमवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी हा सपाटा सुरू केला आहे.
अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरातील फरीदनगर येथील रहिवासी भिकण बुधु नवरंगाबादी (वय ५२) हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, दारूची वाहतूक करणे तसेच अवैधरित्या गावठी दारूची विक्री करीत असल्याने त्याच्यावर पोलिसांनी वारंवार कारवाई केलेली आहे. मात्र, त्यानंतरही तो गावठी दारूभट्टी अवैधरित्या चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, या कारवाईला तो जुमानत नसल्याने अकोला पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, मंगेश महल्ले, ठाणेदार महेंद्र कदम, तायडे यांनी केली आहे.