अकोला : गोरक्षण मार्गावरील दारू विके्रत्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात सापडले आहे. परिसरातील शाळकरी मुली, तरुणी-महिला तसेच लहान मुलांना घराबाहेर निघणे मुश्कील झाले असून, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही निकषांची शहानिशा न करता तातडीने दारू व्यावसायिकांना परवानग्या बहाल केल्या. जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासनाने दारू व्यावसायिकांना दिलेली परवानगी तत्काळ रद्द करून दुकाने बंद न केल्यास ‘ताला ठोको’ आंदोलन छेडणार असल्याचा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे. यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल व नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून, त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारू विके्रत्यांना महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर दारूचा व्यवसाय करण्याचे आदेश जारी केले आहेत. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ लगतच्या दारू व्यावसायिकांनी त्यांची दुकाने गोरक्षण रोडवर स्थलांतरित केली. काही बहाद्दरांनी गोरक्षण रोडवर चक्क दुकानांची दिशा बदलून अनधिकृत इमारतींमध्ये दुकाने थाटली. या प्रकारामुळे गोरक्षण रोड भागातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. दिवस असो की रात्र दारूच्या दुकानांवर दारू विकत घेणाऱ्यांच्या अक्षरश: रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दुकानांच्या समोर थेट रस्त्यावरच दुचाकी-चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. नागरिकांना दारू विकत घेणाऱ्यांचा शिमगा पाहावा लागत असल्यामुळे परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. शाळकरी मुली, तरुणी-महिला, लहान मुले यांची कमालीची कुचंबणा होत असून, अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नागरिकांचा रोष व तक्रारी लक्षात घेता, भाजपाने ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारून वेळप्रसंगी प्रशासनासोबत दोन हात करण्याची पक्षाची तयारी असल्याचे बोलल्या जात आहे. भाजपचा निर्धार; अकोलेकरांची हवी साथ!दारू दुकानांच्या स्थानांतरणाचा मुद्दा गोरक्षण रोड परिसरापुरता मर्यादित नसून, नवीन दुकानांना परवाना देताना त्या भागातील जनमत लक्षात घेणे गरजेचे आहे. परिसरातील शाळा, हॉस्पिटल तसेच दारूच्या दोन दुकानांमधील अंतर आदी निकष महसूल विभागाने पाळणे अपेक्षित आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही नियमांची खातरजमा न करता तसेच नागरिकांचा विरोध डावलून एका दिवसांत दारू व्यावसायिकांना परवानग्या बहाल केल्याचा आरोप भाजपने केला आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता दारूची दुकाने हटविण्याचा भाजपने निर्धार केला असून, आता अकोलेकरांची साथ अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलनदारूच्या दुकानांमुळे गोरक्षण रोड भागातील नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जनआंदोलन छेडल्या जाणार आहे. महापालिकेच्या परवानगीला खो!सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शहराच्या विविध भागात ज्या दारू व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांचे स्थानांतरण केले, त्यापैकी कोणीही महापालिकेच्या परवाना विभागाकडून परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. दारू दुकानांच्या विषयावर सर्वत्र चर्चा होत असताना शहरात नवीन भागात सुरू झालेल्या दुकानांच्या परवानगीच्या बाबतीत महापालिका प्रशासनाने साधलेली चुप्पी संशयास्पद ठरत आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर अशा दुकानांना मनपाकडून परवानगी दिली जाऊ शकते का, असा सवाल सर्वसामान्य अकोलेकर उपस्थित करीत आहेत.गोरक्षण रोडवरील दारूच्या दुकानांमुळे या भागात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हं आहेत. जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास पुढील परिणामांना प्रशासन जबाबदार राहील. -आमदार रणधीर सावरकरदारूच्या दुकानांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात सापडले असून, महिला-तरुणींना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही दुकाने बंद न झाल्यास परिस्थिती चिघळणार, हे निश्चित आहे. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अन्यथा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. -विजय अग्रवाल, महापौर.दारूची दुकाने एकाच ठिकाणी एकवटली असून, त्या ठिकाणी उसळणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिकांसोबत दररोज वाद-विवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुकाने बंद न झाल्यास प्रशासनासह व्यावसायिकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. -बाळ टाले, नगरसेवक प्रभाग १५गोरक्षण रोडसह शहरात ज्या भागात दारू दुकानांचे स्थानांतरण झाले, अशा व्यावसायिकांनी मनपाच्या विविध परवानग्यांना ठेंगा दाखविला आहे. याची संपूर्ण जाण मनपा प्रशासनाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या इमारतींमध्ये दुकाने थाटण्यात आली, त्या इमारती अनधिकृत आहेत. मनपाने उपदेशाचे डोस न पाजता दारूच्या दुकानांना सील लावून शहराच्या सामाजिक स्वास्थ्यालादेखील हातभार लावावा, अशी अपेक्षा आहे. -विजय इंगळे, नगरसेवक प्रभाग २०
दारूची दुकाने बंद न केल्यास ‘ताला ठोको’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2017 12:58 AM