बार्शीटाकळी : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सावित्री हिरासिंग राठोड यांनी नागरिकांच्या तक्रारीनुसार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कान्हेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र, महान, लघु पाटबंधारे विभाग बार्शीटाकळी तथा तालुक्यातील विविध कार्यालयांत बुधवारी २० जानेवारी रोजी भेटी दिल्या. यावेळी शहरातील तालुका आरोग्य विभागाच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले.
भेटीदरम्यान, तालुका आरोग्य विभागात ११ वाजेपर्यंत कार्यालयात कोणीही अधिकारी, कर्मचारी उपास्थित नसल्याने जि.प. उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील अनेक नागरिक कामानिमित शहरातील विविध कार्यालयांत येतात; मात्र कार्यालयात अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार बुधवारी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सावित्री हिरासिंग राठोड यांनी भेट दिली असता चक्क कार्यालयाला कुलूप दिसून आल्याने जि.प. उपाध्यक्षांनी संताप व्यक्त केला. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जि.प. उपाध्यक्षा सावित्री हिरासिंग राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.