- संतोष येलकरअकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ आणि संचार बंदीच्या परिस्थितीत विविध कामांसाठी आलेले दहा राज्यांतील १ हजार १ मजूर अकोल्यात अडकले असून, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून १९ ठिकाणी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे. त्यामध्ये विविध कामांसाठी दहा राज्यांमधून आलेले १ हजार १ मजूर अकोल्यात अडकले आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या या परराज्यातील मजुरांची जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत अकोला शहरासह तालुक्यातील १९ ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ १९ ठिकाणी करण्यात आली मजुरांची निवास-भोजनाची व्यवस्था!दहा राज्यांतील १ हजार १ मजुरांची अकोला शहर व तालुक्यातील १९ ठिकाणी निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोल्यातील खडकी-२२२, निराट-१७०, उगवा-१०५, दहीहांडा-५५, बहिरखेड-४९, दाळंबी-३४, चांडक ले-आऊट खडकी-५३, दोनवाडा-३३, म्हाडा कॉलनी खडकी-४५, खांबोरा-३०, धामणा-३०,अष्टविनायक नगर खडकी-२२, गोरेगाव खुर्द-२२, माझोड-२२, अग्रवाल डुप्लेक्स खडकी-२१, महसूल कॉलनी खडकी-२१, स्वामी समर्थ केंद्र खडकी-२०, कोठारी वाटिका-२० व शिवणी येथे २८ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली.