अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवांसाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. त्यानुसार दुकाने उघडताच रविवारी अकोला शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवर नागरिकांची गर्दी उसळली. बाजारपेठ आणि रस्ते गजबजल्याने कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका कायमच अडल्याचे वास्तव समोर आले.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात ९ ते १५ मे या कालावधीत संपूर्ण कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामध्ये वैद्यकीय सेवा आणि औषधीची दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ मे रोजी दिला. वाढविण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. त्यानुसार संपूर्ण कडक निर्बंधांत सहा दिवसांनंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रविवारी सकाळी उघण्यात आली. दुकाने उघडताच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अकोला शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली. किराणा, भाजीपाला फळे व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. बाजारपेठेसह शहरातील विविध भागांत रस्ते आणि प्रमुख चौक नागरिकांच्या गर्दीने गजबजली होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका कायमच असल्याचे वास्तव समोर आले.