- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने २१ मार्चपासून राज्यात लॉकडाउन केले. त्यामुळे दळण-वळण पूर्ण ठप्प झाले आहे. याचा फटका ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांही बसला आहे. अकोल्यातील ५० ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांना जवळपास तीन कोटींचा फटका सोसावा लागत आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यात वाढताच रेल्वे, एसटी आणि टॅÑव्हल्स-टॅक्सींचा चक्काजाम करण्यात आला, त्यामुळे तेव्हापासून रात्रंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणी थांबल्या आहेत; मात्र गाड्यांवर असणारे चालक-वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन संचालकांना द्यावे लागत आहे. एकाच ठिकाणी उभ्या राहून गाड्यांची बॅटरी उतरू नये, त्या चांगल्या स्थितीत राहाव्यात म्हणून प्रत्येक गाडी थोडा वेळ सुरू करून बंद करावी लागत आहे. अकोल्यात २० ट्रॅव्हल्स आणि ३० टॅक्सी संचालक आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत अकोल्यातील ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांनी तीन कोटीचा व्यवसाय गमाविला आहे. हा व्यवसाय गमाविला असला तरी दररोजचा लागणारा आरटीओ रोड टॅक्स आणि इन्शूरन्सची रक्कम मात्र या गाडीमालकांना भरावी लागणार आहे. इतरांना जाहीर केलेल्या सवलतीप्रमाणे शासनाने ट्रॅव्हल्स आणि टॅक्सीचालकांना देखील सुट जाहीर करावी.ट्रॅव्हल्स-टॅक्सीची मोठी इन्डस्ट्रीज असून, हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. अकोल्यातील ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी युनियनच्या पदाधिकार्यांनी शासनाकडे निवेदन पाठविण्यासाठी बैठक बोलाविली आहे.
लॉकडाउनचा फटका सर्वांनाच बसला आहे; मात्र काही ठराविक लोकांनाच शासनाने सवलती जाहीर केल्यात. शासनाने ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी संचालकांना तीन महिन्यांसाठी रोड टॅक्स आणि इन्शूरन्समध्ये सुट द्यावी.-ठाकूरदास चौधरी,टॅक्सी संचालक अकोला.