- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लॉकडाउन व संचारबंदी असल्याने परप्रांतातील तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यातील नागरिक विविध ठिकाणांवर अडकले असून, त्यांच्या घराकडे जाण्यासाठी त्यांनी मध्यरात्री २ ते ५ या वेळेत स्थलांतर सुरू केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पहाटे ६ पासून ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रत्येक शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने या वेळेत जाण्यास अडचणी येतात. त्यामुळेच त्यांना चकवा देण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांनी मध्यरात्री स्थलांतर करण्याची शक्कल लढविली आहे. या वेळेत पोलिसांची संख्या काही प्रमाणात कमी होताच स्थलांतर करणारे याचाच फायदा घेऊन शहराच्या बाहेर निघून जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाले.महाराष्टÑात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्याने नागरिकांना आहे त्याच ठिकाणी रोखणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यासाठी एका जिल्ह्यातील व्यक्ती दुसºया जिल्ह्यात जाऊ शकत नाही. शेजारीच असलेल्या यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात तर रुग्ण संख्या अधिक असल्याने शहर व त्याच्या चारही सीमा सील करण्यात आल्या आहेत; मात्र या सीमेवर प्रत्येक जिल्ह्यात दिवसाच अधिक जास्त खबरदारी घेतली जात आहे. रात्री १२ नंतर पोलिसांची संख्या कमी होताच संधी साधून परप्रांतीय मजूर असो अथवा नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले विद्यार्थी रात्रीच्या याच वेळी प्रवास करून आपआपल्या ठिकाणी रवाना होत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण येथून आलेले परप्रांतीय मजूरच जास्त असल्याचे आढळून आले आहे.
अन्न नको, आम्हाला घरी जाऊ द्या... स्थलांतर करणाºया नागरिकांसाठी ठिकठिकाणी निवारागृहे उभारण्यात आलेली आहेत. येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था होत असली तरी आम्हाला हे काहीच नको, आमच्या गावालाच आम्हाला जाऊ द्या..तेथे कोणाचे आई, वडील तर कोणाची मुले आहेत. अनेक दिवसांपासून रोजगार नाही. हातात पैसा नाही. घरी गेल्यावर पोट तरी भरेल व कुटुंबाच्या डोळ्यासमोर राहू, असे अनेक मजुरांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमचे नाव व फोटो वृत्तपत्रात देऊ नका, असेही हे मजूर म्हणाले.
टोलनाके बंदचाही घेतला फायदा २० एपिलपर्यंत महामार्गावर कुठेही टोलनाके सुरू नव्हते तसेच रात्रपाळीचे पोलीसदेखील ११ नंतर कमी झालेले असतात. मध्यरात्री २ ते पहाटे ६ या वेळेत पोलिसांच्या संख्या कमी असल्याने याचाच फायदा घेऊन नागरिकांनी स्थलांतर केल्याची माहिती आहे. रविवारी सायंकाळीच जळगाव खान्देश येथून विद्यार्थ्यांचा एक जथ्था वर्ध्याकडे जात असल्याचे अकोला महामार्गावर दिसून आले.
एमपीत जाण्या-येण्यास रेल्वे रुळाचा उपयोगमध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा या परिसरात जाण्यासाठी तसेच जिल्ह्यात आगमनासाठी रेल्वे रुळावरून ये-जा करण्यात येत असल्याची माहिती आहे. ५०० ते १ हजार किलोमीटरचा प्रवास परप्रांतीय तसेच महाराष्ट्रातील नागरिकांनी रेल्वे मार्गानेच सुरू केल्याचीही धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. घराची ओढ लागल्याने त्यांनी निवारा सोडून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे.