- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारीला टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला. त्यामुळे २१ मार्चपासून राज्यभरातील बसगाड्या आहे तिथेच थांबविण्यात आल्या आहेत. या ४३ दिवसांत अकोलाएसटी विभागाने २२ कोटी ६१ लाख ५१ हजार ३१९ रुपयांचे उत्पन्न गमाविले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अकोला विभागांतर्गत अकोला १, अकोला २, अकोट, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड, तेल्हारा, मूर्तिजापूर डेपोचा कारभार चालतो. विभागातून दररोज २२२० फेºया चालतात. कोरोना संक्रमणामुळे दररोजच्या फेºया थांबल्याने १४,६०५२ किमीचा दररोजचा प्रवास रद्द झाला आहे. त्यामुळे दररोज होणारे ५२ लाख ५९ हजार ३३३ रुपयांचे उत्पन्नही थांबले आहे. २१ मार्च ते ३ मेपर्यंतच्या ४३ दिवसांचा हिशेब केल्यास अकोला एसटी विभागाने २२ कोटी ६१ लाख ५१ हजार ३१९ रुपयांचे उत्पन्न गमाविले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने एसटी विभागाच्या बसगाड्या यापुढे कशा धावतील, याबाबत संभ्रम आहे.
मार्गदर्शक तत्त्वाच्या निर्देशांची प्रतीक्षा...शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढच्या निर्देशांची वाट पाहणे सुरू आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनेक मार्गदर्शक तत्त्वे पुढे सांभाळण्याची गरज आहे. सॅनेटायझरिंग सोबतच, सामाजिक अंतर आणि चालक-वाहकांसोबतच प्रवाशांची घ्यावयाची काळजी काय असेल, याची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच येणार असल्याचे संकेत आहेत.
लॉकडाउनच्या काळात डीझल गाड्यांचा आणि त्यातील बॅटरींचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येक डेपोत दररोज गाड्या सुरू करून बंद कराव्या लागत आहेत. आम्ही अत्यावश्यक सेवेत असलो तरी शासनाच्या मार्गदर्शक निर्देशाची वाट पाहणे सुरू आहे.- चेतना खिरवाळकर, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग अकोला.