जिल्ह्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले अकोला मनपा, मूर्तिजापूर व अकोट नगरपालिका क्षेत्रांना प्रतिबंधित क्षेत्र, तर अकोला ग्रामीण, बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर तालुक्यांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ठेवत या दोन्ही भागांसाठी स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अकोला, अकोट व मूर्तिजापूर शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असून, इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी अकोला शहरातील सर्वच बाजारपेठांमधील गैर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहिली. परंतु, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी झाल्याचे दिसून आले. आधीच्या आदेशानुसार शहरातील पाच पेट्रोलपंपांनाच मुभा देण्यात आली होती. त्यामुळे इतर पेट्रोलपंप बंद राहिल्याने सुरू असलेल्या पेट्रोलपंपावर नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. उघडी असलेली दुकाने, पेट्रोलपंप, औषधांची दुकाने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. काही पेट्रोलपंपावर केवळ अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्यांनाच पेट्रेाल देण्यात येत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गोची झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारित आदेश काढण्यात येऊन सर्वच पेट्रोलपंप दुपारी तीन, तर निवडक पाच पेट्रोलपंप रात्री आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर पेट्रोलपंपांवरची गर्दी कमी झाली. दुपारी ३ वाजता आवश्यक वस्तूंची दुकाने बंद झाल्यानंतर रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी ओसरल्याचे दिसून आले.
लॉकडाऊन : दुकाने बंद, वर्दळ कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:20 AM