लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या पृष्ठभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार ३ मेपर्यंत असलेल्या लॉकडाउनच्या अनुषंगाने लागू असलेल्या संचारबंदीत ठरावीक क्षेत्रांना मर्यादित कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मुभा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिला आहे. तथापि, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असलेल्या व प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या भागात मात्र कोणतीही मुभा असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले असून, यासंबंधी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.हे उद्योग, सेवा सुरू होणार!शेती व फळबागासंबंधीतील सर्व कामे, शेतामध्ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे, कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतीविषयक यंत्राची व त्यांचे सुटे भागाची विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने, रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे यांचे उत्पादन वितरण व किरकोळ विक्री.
सर्व आरोग्य सेवा सुरू राहतील तसेच औषधे, फार्मास्युटिकल, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय आॅक्सिजन तसेच त्यांचे पॅकेजिंग साहित्य, कच्चा माल आणि मध्यवर्ती घटकांचे युनिट यांना परवानगी देण्यात आली.
नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारतींचे बांधकाम तसेच सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्पाचे बांधकाम सुरू राहील. नवीनीकरण ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम, नगर परिषद, नगरपंचायत हद्दीतील सुरू असलेली बांधकामे जेथे मजूर उपलब्ध आहे व बाहेरून मजूर आणण्याची गरज पडणार नाही, अशी कामे सुरू राहतील. तसेच मान्सूनपूर्व संबंधित सर्व कामे.
सामाजिक अंतर व मास्क लावणे या बाबीची कडक अंमलबजावणी करून मनरेगाची कामे मंजूर करावी, त्यात सिंचन व जलसंधारणाच्या कामांना मुभा राहील.
नगर परिषद हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग तसेच औद्योगिक आस्थापनामध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था सामाजिक अंतराच्या नियमाची अंमलबजावणी करून कंत्राटदाराने कामगारांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केल्यास अशा उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.
दूध संकलन, प्रक्रिया, वितरण व विक्री, फरसान व स्वीटमार्ट (दुकानावरून घेऊन जाणे अथवा पार्सल डिलिव्हरी इ. कामे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजतापर्यंत तसेच सायं. ४ ते सायं. ७ वाजतापर्यंत.)
संचारबंदी रविवार ३ मेपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद राहतील. या संचारबंदी आदेशातून औषधे, दूध, बँक व्यवहार, कृषी निविष्ठा व यंत्रसामग्रीची प्रतिष्ठाने, गॅस, पाणी, वीज पुरवठा इ. अत्यावश्यक सेवा पूर्वी दिलेल्या आदेशानुसार व त्या कालमर्यादेत सुरू राहतील. या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चा ४५ च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असलेल्या व प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या भागात मात्र कोणतीही मुभा असणार नाही, अशा क्षेत्रात प्रवेश करणे व त्याच्या बाहेर येण्यास मनाई कायम आहे.
सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक, शिक्षण संस्था, सिनेमा हॉल, शॉपिंग काम्प्लेक्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, दारूची दुकाने, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.